‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ कलनरी आर्ट्स अँड सायन्स’ च्या प्रस्तावित इमारतीचे भूमीपूजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न
पुणे : बालेवाडी, पुणे येथे ‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ कलनरी आर्ट्स अँड सायन्स’ च्या प्रस्तावित इमारतीचे भूमीपूजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या ‘नवीन शैक्षणिक धोरणा’ला (NEP) अनुसरून या इन्स्टिट्यूटची उभारणी होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, बदलत्या काळानुसार युवकांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. ही संस्था केवळ इमारत नसून, भविष्यातील कुशल मनुष्यबळ घडवणारे एक उत्तम केंद्र ठरेल आणि येणाऱ्या काळात तिचा विस्तार निश्चितपणे होईल, असा मला विश्वास असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
या प्रसंगी आ. अतुल भोसले, स्थानिक नगरसेविका मयूरी कोकाटे, रोहिणी चिमटे, माजी आमदार संजय जगताप, भाजपाचे कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, जागृती शुगर अलाईड इंडस्ट्रीच्या संचालिका सुवर्णा देवी देशमुख, कृष्णा फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालिका गौरवी भोसले, कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम व्ही घोरपडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.