महायुती सरकारच्या कार्यकाळात उच्च व तंत्रशिक्षण विभागात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला प्राथमिकता देऊन गती दिली – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मित्रा आणि विवेक स्पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. भानुबेन नानावटी महिला महाविद्यालयात आयोजित ‘पश्चिम महाराष्ट्र विकास मंथन’ चर्चासत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सहभाग घेतला. यावेळी चर्चासत्राला शुभेच्छा देताना राज्याच्या प्रगतीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत पाटील यांनी माहिती दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या कार्यकाळात उच्च व तंत्रशिक्षण विभागात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला प्राथमिकता देऊन गती दिली. परिणामी आज संपूर्ण देशात महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. आगामी काळात कौशल्यावर विशेष लक्ष केंद्रित करुन त्यासाठी उपाययोजना करणार असल्याची भूमिका याप्रसंगी त्यांनी मांडली.
यावेळी रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह अतुलजी लिमये, पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी, उद्योजक सुधीर मेहता, उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, स्पार्क विवेकचे महेश पोहनेरकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.