‘भारताची प्रतिभा’ पुस्तक येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

7

पुणे : पुणे येथे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या गौरवशाली जीवनप्रवासावर आणि कार्यकर्तृत्वावर आधारित ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार सर यांच्या शुभहस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, आजचा हा सोहळा अत्यंत हृदयस्पर्शी होता. प्रतिभाताईंनी आपले संपूर्ण आयुष्य निष्ठेने समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. याच कार्याची दखल घेत देशभरातील अनेक मान्यवरांनी त्यांच्याबद्दलचे अनुभव आणि आठवणी या पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध केल्या आहेत. एका सामान्य कार्यकर्तीपासून ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा प्रवास येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल. जास्तीत जास्त वाचकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे, अशी भावना याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केली.

या सोहळ्याला महापौर मंजुषाताई नागपुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुस्तकाच्या निर्मात्या व प्रतिभाताईंच्या कन्या ज्योतीताई राठोड, ऍड. प्रताप परदेशी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सुरेश उज्जेनवाल, राजेश पांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.