बारामती पोटनिवडणुकीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील मैदानात; कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन

6

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बारामती मतदारसंघाचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध मंडळांचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन निवडणूक रणनीतीचा आढावा घेतला, तसेच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला.

दौऱ्याची सुरुवात करताना पाटील यांनी बारामती तालुका दक्षिण मंडल अध्यक्ष सुनीलजी माने यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने केलेली विकासकामे घराघरांत पोहोचवून सुनेत्रा वहिनींना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आता सर्वांनी जोमाने कामाला लागावे. त्यानंतर त्यांनी पश्चिम मंडल अध्यक्ष शाम कोकरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कोकरे कुटुंबियांशी संवाद साधला आणि निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनाचा आढावा घेतला.

राजकीय भेटीगाठींसोबतच पाटील यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ मार्गदर्शक चंदर आण्णा तावरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी आण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करत विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या दौऱ्यामुळे बारामतीतील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, प्रचाराची गती वाढली आहे. या दौऱ्यात भाजप आणि महायुतीचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.