कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा – उद्योगमंत्री उदय सामंत

76

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कार्यरत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मुलांनाही भविष्यात आपल्या उद्योगाची पायाभरणी करता आली पाहिजे. विविध उद्योग व्यवसायांना सकारून देण्याचे कसब अंगी असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना हे बाळकडू घरूनच असल्याने ते यात कमी पडणार नाहीत. यादृष्टीने विचार करून गुणवत्ताधारक पाल्यांना आयपॅड व इतर साहित्य देऊन प्रोत्साहन देण्याची भूमिका उद्योग विभागाने घेतली असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

नियोजन भवन येथील सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी कर्मचारी यांच्या आठवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या गुणवत्ताधारक पाल्यांना टॅब व शैक्षणिक आज्ञावलीच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय जेव्हा विभाग प्रमुख म्हणून, या विभागाचे मंत्री म्हणून आम्ही घेतो तेव्हा नकळत या यशामागे या विभागातील कर्मचाऱ्यांचेही हात व मेहनत आहे, याची जाणीव उद्योग मंत्री म्हणून मी प्रत्येक वेळेस ठेवली आहे. या जाणिवेतूनच आपल्या आरोग्य विमाबाबत, आपल्याला लागणाऱ्या सेफ्टी साहित्य  याचबरोबर दुचाकी वाहनासाठी पूर्वी असलेली मर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

अलीकडच्या वर्षात महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेऊन यासाठी लागणारी कामे अतिशय अल्प कालावधीत पूर्ण करून दाखवले. अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क साठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन हे केवळ 45 दिवसात आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी करून दाखवले याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नागपूर व अमरावती विभागातील 51 पाल्यांना टॅब देण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्य राजेश झंजाड, अधीक्षक अभियंता सुनील अकुलवार, प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे व मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.