पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध – आमदार चित्रा वाघ

जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर दहशतवादी भ्याड हल्ला करण्यात आले. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक पर्यटक गंभीररित्या जखमी झाले आहेत.या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. यात संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी हे आहेत. या हल्ल्यावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले , जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आणि अमानुष दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, ही घटना अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे. या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय यांच्याशी आम्ही मनःपूर्वक सहवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकरात लवकर ठणठणीत होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या , प्राप्त माहितीनुसार, या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटक दिलीप डिसले आणि अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माणिक पटेल (पनवेल) आणि एस. भालचंद्रराव हे दोघे जखमी झाले असून, सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दहशतवाद्यांकडून नागरिकांवर होणारा प्रत्येक हल्ला हा आपल्या राष्ट्राच्या एकतेवर, शांततेवर आणि सार्वभौमत्वावर केलेला आघात आहे. अशा कृत्यांचा आपण सर्वांनी एकजुटीने आणि निर्धाराने सामना केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या खंबीर नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. पाक पुरस्कृत या हल्ल्यातील दहशतवाद्यांना योग्य ती आणि कडक कारवाई निश्चितपणे केली जाईल, याची खात्री आहे. या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा मी पुन:श्च तीव्र निषेध करते, असे वाघ यांनी म्हटले.