गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयजी रुपाणी यांच्या अहमदाबादमधील निवासस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन विजयजींना वाहिली श्रध्दांजली

अहमदाबाद : नुकत्याच झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयजी रुपाणी यांचे दु:खद निधन झाले. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अहमदाबादमधील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन विजयजींना श्रध्दांजली वाहिली. तसेच, रुपाणी कुटुंबियांचे सांत्वन केले.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले कि, विजयजी रुपाणी यांचे दु:खद निधन माझ्यासाठी हा वैयक्तिक आघात आहे. ज्या विचारधारेशी आम्ही जोडले गेलो, त्या विचारधारेशी अखेरपर्यंत समर्पित असे हे व्यक्तिमत्व. साधेपणा आणि नम्रता या सदगुणांचा अलंकार विजयजी यांनी अखेरपर्यंत जपला. गुजरातसारख्या राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवूनही त्यांच्यातील अभाविप कार्यकर्ता त्यांनी स्वतःत जिवंत ठेवला. त्यांची कारकीर्द माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे, असे पाटील यांनी म्हटले.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे गुरुवारी, १२ जून रोजी विमान अपघातात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. २४२ प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ते होते. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच ते कोसळले आणि मोठी जीवितहानी झाली. शहरातील मेघानीनगर परिसरात ही घटना घडली.