लोणेरेच्या ‘बाटू’ विद्यापीठात आयबीएम क्वांटमच्या ‘क्विस्किट फॉल फेस्ट’चे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांमध्ये ‘बाटू’ची निवड

16

लोणेरे : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू) आयोजित आयबीएम क्वांटमच्या ‘क्विस्किट फॉल फेस्ट २०२६’ या तीन दिवसीय उपक्रमाचे सोमवारी २६ ऑक्टोबर रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जगभरातील १६० शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये या उपक्रमासाठी बाटूची निवड होणे, ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रासाठी महत्त्वाची उपलब्धी आहे. या निमित्ताने क्वांटम संगणनासारख्या भविष्यवेधी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात संबोधित करताना पाटील म्हणाले, महाराष्ट्र क्वांटम तंत्रज्ञान मिशनअंतर्गत विद्यापीठाला मंजूर झालेला ₹२.५ कोटींचा निधी अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन आणि कौशल्यविकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच बांबू कौशल्य विकास व संशोधन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन, इनक्युबेशन केंद्राद्वारे नवकल्पनांना व्यासपीठ आणि रोटरी इंटरनॅशनलच्या सहकार्याने उभारलेल्या बंधाऱ्यांमधून ३० हून अधिक गावांच्या पाणीपुरवठ्याला मिळणारा आधार, हे विद्यापीठाच्या कार्याचे व्यापक स्वरूप अधोरेखित करतात.

जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, संशोधनाधिष्ठित शिक्षण, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि समाजोपयोगी उपक्रम यांची सांगड घालत बाटूने विकासाचे बहुआयामी प्रारूप उभे केले आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला संशोधनाची, संशोधनाला उद्योगाची आणि उद्योगाला रोजगाराची जोड मिळावी, या दिशेने विद्यापीठाचे प्रयत्न निश्चितच महत्त्वाचे आहेत, असेही पाटील यावेळी म्हणाले.

या उपक्रमांसाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. विनोद मोहितकर, कुलसचिव डॉ. सचिन पोरे तसेच सर्व प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचे मंत्री पाटील यांनी अभिनंदन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.