पिंपरी-चिंचवड मध्ये ‘महापौर चषक-२०२६’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन… महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी अशा स्पर्धा निश्चितच प्रेरणादायी – मंत्री चंद्रकांत पाटील
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘महापौर चषक-२०२६’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मैदानावरील खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्या जिद्दीला, मेहनतीला आणि क्रीडाभावनेला पाटील यांनी प्रोत्साहन दिले.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून ‘शिवछत्रपती पुरस्काराने’ सन्मानित खेळाडूंचा गौरव चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी अशा स्पर्धा निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ चे उदघाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही १० मेपर्यंत चालणार असून, या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित कबड्डी संघांच्या एकूण ८१२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये पुरुष गटातील ३६ आणि महिला गटातील २४ संघ आहेत. स्पर्धेचे सामने सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडावेत, यासाठी तब्बल ५५ सामनाधिकारी कार्यरत आहेत.
या कार्यक्रमास विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे तसेच भाजपाचे सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.