पिंपरी-चिंचवडमधील ‘झेप पुनर्वसन केंद्रा’स मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट; दिव्यांग मुलांच्या कार्याचे केले कौतुक
पिंपरी-चिंचवड : दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील नामांकित ‘झेप पुनर्वसन केंद्रा’स राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रातील दिव्यांग मुलांशी आपुलकीने संवाद साधला आणि संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
या भेटीदरम्यान केंद्रातील मुलांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. मुलांनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, चित्रे आणि त्यांच्या कलागुणांची पाहणी करून त्यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले. “या विशेष मुलांच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य आणि त्यांचा आत्मविश्वास मनाला खूप मोठी ऊर्जा देणारा आहे,” अशा भावुक भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

झेप पुनर्वसन केंद्राच्या वतीने दिव्यांग मुलांना थेरपी, विशेष शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत, त्याचा मंत्री पाटील यांनी गौरव केला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी केंद्राच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि शासकीय पातळीवर तसेच वैयक्तिक स्तरावर संस्थेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे खंबीर आश्वासन दिले.
या प्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संस्थेचे संस्थापक, शिक्षक, थेरपिस्ट आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.