पिंपरी चिंचवडमध्ये ‘नारी शक्ती महोत्सव’ उत्साहात; कर्तृत्ववान महिलांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान
चिंचवड : पिंपरी चिंचवड येथे राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग, समरसता साहित्य परिषद आणि विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘नारी शक्ती महोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या विशेष सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून समाजकारण, शिक्षण, उद्योग आणि संस्कृती यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा विशेष गौरव केला.
महोत्सवामध्ये उपस्थित माता-भगिनींना मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान आदर्शाचा आणि कर्तृत्वाचा गौरव केला. ते म्हणाले, “राज्य सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेला मोफत व्यावसायिक शिक्षणाचा निर्णय आणि नव्याने सुरू झालेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यामुळे राज्यातील महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होत आहेत. महिलांचे हे सक्षमीकरणच विकसित महाराष्ट्राचा खरा पाया आहे, असे नमूद केले.

याच दिमाखदार महोत्सवाचे औचित्य साधून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आमदार उमाताई खापरे आणि ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून समाजात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांच्या कार्याला मानवंदना देत, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करण्यात आला. महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश अधिक दृढ करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. यानंतर सुप्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर यांच्या सुरेल गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
या सोहळ्याला आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, ॲड. वर्षाताई डहाळे, डॉ. संजीवनी पांडे, सदाशिव खाडे, जयदीप खापरे व प्रवीण तुपे यांच्यासह राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.