पिंपरी येथे शालेय पोषण आहाराच्या अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; अन्नामृत फाऊंडेशन व मनपाचा संयुक्त उपक्रम
पिंपरी : शाळकरी विद्यार्थ्यांना स्वच्छ, पौष्टिक आणि दर्जेदार आहार मिळावा या उद्देशाने पिंपरी येथे अन्नामृत फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने नूतनीकरण करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या केंद्रीय स्वयंपाकगृहाचे (Central Kitchen) उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि उत्तम पोषण हाच कोणत्याही सक्षम समाजाचा पाया असतो. हे स्वयंपाकगृह आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यात आले असून, याद्वारे हजारो विद्यार्थ्यांना अत्यंत हायड्रॉलिक आणि दर्जेदार अन्न पुरवले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यांनी या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करून समाधान व्यक्त केले व या लोककल्याणकारी उपक्रमाला तसेच अन्नामृत फाऊंडेशन व महापालिकेच्या पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या केंद्रीय स्वयंपाकगृहाच्या अद्ययावत स्वरूपामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील शासकीय व महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वेळेवर आणि सकस आहार मिळण्यास मोठी मदत होणार असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
या प्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, इस्कॉन इंडियाचे गौरांग प्रभू, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, नगरसेविका सारिका मासुळकर, वैशाली घोडेकर, नगरसेवक राहुल भोसले, सिद्धार्थ बनसोडे, संस्थेचे संजय टीक्कू आदी उपस्थित होते.