विधान भवन येथे महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन-२०२६ चा यशस्वी समारोप; पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात

6

मुंबई : मुंबईतील विधान भवन येथे महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन-२०२६ चा यशस्वी समारोप झाला. या निमित्ताने विधिमंडळातील सर्व पक्षांचे सदस्य विधानभवनाच्या ऐतिहासिक पायऱ्यांवर एकत्र येऊन सामूहिक छायाचित्रासाठी उपस्थित राहिले. हा क्षण संसदीय लोकशाहीची समृद्ध परंपरा, परस्परांतील सौहार्द आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली सामूहिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे , विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर , विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह विधिमंडळाचे सर्व सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकहिताशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा झाली. अनेक जनकल्याणकारी विधेयकांवर विचारविनिमय करण्यात आला तसेच महत्त्वाच्या शासकीय कामकाजाची प्रभावीपणे पूर्तता करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 14 बैठका घेण्यात आल्या असून 127 तास 54 मिनिटांचे प्रत्यक्ष कामकाज झाले. रोजच्या कामकाजाची सरासरी 9 तास 9 मिनिटे इतकी राहिली, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.

अधिवेशनादरम्यान 9095 प्रश्न प्राप्त झाले. त्यापैकी 410 प्रश्न स्वीकृत करण्यात आले आणि 58 प्रश्नांना सभागृहात उत्तरे देण्यात आली. याशिवाय 500 प्रश्नांची लेखी उत्तरे देण्यात आली.

अल्पकालीन चर्चेसाठी प्राप्त झालेल्या 6 सूचनांपैकी 5 मान्य करण्यात आल्या आणि 3 चर्चा पार पडल्या. लक्षवेधी सूचनांच्या 2998 सूचनांपैकी 292 स्वीकृत करण्यात आल्या, तर 62 सूचनांवर सभागृहात चर्चा झाली. नियम 293 अन्वये प्राप्त झालेल्या पाचही प्रस्तावांवर चर्चा झाली.

अधिवेशनादरम्यान सात अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. शासकीय 22 विधेयके पुरःस्थापित करण्यात आली. त्यापैकी 21 विधेयके विधानसभेने संमत केली, तर एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले. विधान परिषदेने नऊ विधेयके संमत केली. अशासकीय 29 विधेयकांच्या सूचनांपैकी 11 मान्य करण्यात आल्या. त्यापैकी 12 विधेयके पुरःस्थापित आणि आठ विचारात घेण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार, 7 डिसेंबर 2026 रोजी नागपूर येथील विधानभवनात होणार असल्याची अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.