सीओईपी पदभरतीसाठी तातडीने ‘एनओसी’ देऊन जूनपर्यंत उमेदवारांना रुजू करा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

7

मुंबई, २६ नोव्हेंबर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मुंबईतील होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी पुण्यातील सीओईपी (COEP) तंत्रज्ञान विद्यापीठातील पदभरती प्रक्रियेसाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) तातडीने देण्याचे निर्देश दिले असून, येत्या जून महिन्यापर्यंत निवड झालेले उमेदवार प्रत्यक्ष सेवेत रुजू होतील, या दृष्टीने कालमर्यादा निश्चित करून कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या आढावा बैठकीत विभागातील प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांची सद्यस्थिती आणि त्यावरील पुढील कायदेशीर कार्यवाही याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात आली. न्यायालयीन प्रकरणे विहित वेळेत निकाली काढण्यासह पदभरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने पूर्ण करण्यावर ना. पाटील यांनी भर दिला.

या महत्त्वपूर्ण बैठकीप्रसंगी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, सहसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, सहसंचालक रुपेश राऊत यांच्यासह विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.