ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, येथे कोणताही गरजू उपाशी राहणार नाही

1

रायगड : “कोविड-19 कम्युनिटी किचन” मुळे मिटला जवळपास चार हजार मजूरांच्या जेवणाचा प्रश्न

करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. या काळात परजिल्ह्यातील, परराज्यातील बराचसा मजूर वर्ग, जिल्ह्यातच अडकले. हातावरचे पोट असलेल्या या मजूरांपुढे या काळात कामेच बंद झाल्याने खायचे काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला. मात्र धडाडीने काम करणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मात्र या मजूरांना आश्वस्त केले की, तुमच्यापैकी कोणीही उपाशी राहणार नाही. अनेक मजूर कॅम्पला जिल्हांधिकारी निधी चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देत मजूरांचा आत्मविश्वास वाढविला. त्यांना धीर दिला की, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या जिल्ह्यात आहात, आम्ही तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही…आणि बघता बघता सर्वाधिक मजूर ज्या भागात अडकले आहेत, त्या पनवेल तालुक्यातील उलवे आणि सुकापूर भागातील अडकलेल्या मजूरांकरिता,गरीब,गरजूंकरिता “कोविड 19-कम्युनिटी किचन” सुरू करण्यात आले. यासाठी प्रांताधिकारी दत्तात्रय नवले आणि तहसिलदार अमित सानप यांनीही पणच केला की, जोपर्यंत या सर्व मजूरांच्या जेवणाचा प्रश्न मिटणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. झपाटून कामाला लागले आणि जिल्हापधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कम्युनिटी किचन अवघ्या काही दिवसातच सुरू झाले.
उलवे भागातील जवळपास तीन हजार आणि सुकापूर भागातील जवळपास एक हजार अडकलेल्या मजुरांसाठी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था या कम्युनिटी किचन च्या माध्यमातून सुरु झाली आहे. यासाठी हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे, 9999715876 या क्रमांकावर संपर्क साधून पनवेल तहसील कार्यक्षेत्रातील मजूरांना या कम्युनिटी किचन बाबतची माहिती, मदत मिळू शकेल. पाली देवद येथे हे किचन सुरू करण्यात आले असून सर्व मजूरांना फूड पॅकेट देवून नाश्ता-जेवण पुरविले जात आहे.