महाड तालुक्यातील ‘घावरेकोंड’ या गावाचे नाव बदलून ‘श्रीराम नगर’ करा; तटकरेंची अमित शाहांकडे मागणी

73

रायगड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी नुकतीच दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भेटीचं कारण म्हणजे रायगड लोकसभा मतदार संघात येणाऱ्या महाड तालुक्यातील ‘घावरेकोंड’ या गावाचे नाव बदलून ‘श्रीराम नगर’ असे करण्यासंबंधी हि भेट असल्याची माहिती तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. राम नामाची मागणी तटकरे यांच्याकडून झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

माझ्या लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ‘घावरेकोंड’ या गावाचे नाव बदलून ‘श्रीराम नगर’ असे करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावासंदर्भात मी आज केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांची भेट घेऊन निवेदन दिले. सदर प्रस्तावावर राज्य शासनाने बारकाईने विचारविनिमय केला असून, गावकऱ्यांच्या स्थानिक अभिमानाच्या व भाषिक भावना लक्षात घेऊन तसेच स्थानिक जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या नामांतरास मान्यता द्यावी, अशी मागणी अमित शाह यांच्याकडे केली असल्याचे तटकरे यांनी या माध्यमातून सांगितले आहे.

रायगड जिल्ह्यात किंवा त्याच्या आसपासच्या भागात ‘श्रीराम नगर’ नावाचे अन्य कोणतेही गाव अस्तित्वात नाही. तसेच, गावकऱ्यांकडून या नामांतरास कोणताही आक्षेप नोंदविण्यात आलेला नाही. स्थानिक जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेता माझा देखील गावकऱ्यांच्या या मागणीस पूर्णपणे पाठिंबा असून केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी निर्देश द्यावेत, अशी नम्र विनंती त्यांनी गृहमंत्री शाह यांच्याकडे केली आहे.

शिवसेनेचे नेते राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांचे आणि तटकरे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. पालकमंत्री पदावरून सुरु झालेल्या या वादाने आता एकमेकांच्या विरोधकांना बळ देण्याचे काम सुरु केलं आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाड मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाच्या पराभूत उमेदवार स्नेहल जगताप यांना तटकरे यांनी दादांच्या राष्ट्रवादीत घेऊन महाड नगरपरिषदेत होणाऱ्या महासंग्रामाचा शंखनाद केला आहे तर दुसरीकडे जगतापांनी सतत केलेल्या पक्ष बदलांमुळे त्यांची विश्वासार्हता देखील कमी झाली असल्याचे गोगावले सांगतात. त्यात आता गावकऱ्यांच्या आग्रहा खातर असणारी हि नामांतराची नवी मागणी या गोगावले – तटकरे वादात आणखी तेल ओतणार कि राम नामावर दोघांचं एकमत होणार ? हे येणाऱ्या काळातच समजेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.