महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील क्रीडा संकुलं होणार अद्यावत, मंत्री दत्ता भरणेंनी दिले निर्देश

मुंबई, दि. ०८: रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदार संघातील तीनही तालुत्यातील क्रीडा संकुलाच्या उभारणीचा आणि असणारी संकुल अद्यावत करण्याचा महत्वाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. या संदर्भातील महत्वपूर्ण बैठक आज राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता भरणे यांच्या दालनात पार पडली. महाडचे आमदार आणि राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी तालुक्यातील क्रीडा संकुलांच्या विषयाबाबत पाठपुरावा केला होता.
विभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, उपसंचालक नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थित मंत्री दत्ता भरणे यांनी राज्याचे रायगड येथील पोलादपूर, महाड, माणगाव येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी मंत्री भरणे यांनी माणगाव येथील क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी बहुउद्देशीय सभागृहात बॅडमिंटन कोर्टसह चेंजिंग रूम व प्रसाधनगृह, बंदिस्त प्रेक्षागृह, बॅडमिंटन कोर्ट, धावनमार्ग, विविध खेळाचे मैदान अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; तसेच महाड क्रीडा संकुलाची डागडुजी करण्यात यावी. अद्ययावत टर्फचे फुटबॉल, क्रिकेट मैदान व त्या परिसरातील प्रचलित असलेल्या खेळांच्या क्रीडांगणांसाठीची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री भरणे यांनी दिल्या.