मुंबई : सायन हॉस्पिटल व्हिडीओ प्रकरणी चौकशी समिती नियुक्त, २४ तासात अहवाल मागवला
मुंबई – महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांच्याबाजूला रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी ट्विट केला होता. याची दखल घेत या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी चौकशी समितीने 24 तासात अहवाल मागवला असून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या सायन म्हणजेच लोकमान्य टिळक रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असलेल्या वॉर्डमध्येच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधून ठेवले होते. या मृतदेहाच्या बाजूलाच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व त्या मृतदेहांच्या बाजूला रुग्णांचे नातेवाईक तसेच डॉक्टर, नर्स, कर्मचारी फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हाच व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करत पालिकेचे आणि रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
याची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती या व्हिडिओची सत्यता आणि वास्तविकता पडताळणार आहे. 24 तासात त्याचा अहवाल मागविण्यात आला असून चौकशीत आढळलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.