पवारांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार; सुनील तटकरेंचे गीतेंना प्रत्युत्तर

मुंबई: माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘शिवसैनिकांनी आघाडीचा विचार करू नये. फक्त आपले घर सांभाळावे,’ असं थेट आवाहन गीते यांनी केलं होते. ‘आघाडी ही फक्त सत्तेसाठी झालेली तडजोड आहे. शरद पवार हे शिवसैनिकांचे गुरू होऊ शकत नाहीत,’ असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं होते.
आता त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरेंनी शेलक्या शब्दात अनंत गीते यांना खडेबोल सुनावले.
अनंत गीते यांनी जे वक्तव्य केलं, त्याबाबत मी बोलणार आहे. भाजपाच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल अशा प्रकारची वक्तव्यं करण्यात आली तेव्हा तो गळून पडला होता. अलीकडच्या काळात गीते यांची राजकीय अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे. त्यामुळे अशा भावनेतून त्यांचे हे वैफल्यग्रस्त उद्गार आले आहेत, असं मला जाणवत आहे. मात्र त्यांच्या बोलण्याने पवार साहेबांचं कर्तृत्व कमी होणार नाही. अतिनैराश्यापोटी राजकीय भान हरपून केलेली ही टीका आहे. राज्याला, देशाला पवारसाहेबांचं काम माहिती आहे.
सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे, असं सुनील तटकरे म्हणाले. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, आघाडीचे जनक आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारला देशपातळीवर नावाजलं जात आहे. त्यामुळे अडगळीत पडलेल्या नेत्यांकडून काही वक्तव्ये येत आहेत. गीतेंच्या विधानाला महत्त्व देण्याचं कारण नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.