बंडखोर भाजप नगरसेवकांना अपात्रेच्या नोटीसा; विभागीय आयुक्तांच्या पत्राने खळबळ

9

जळगाव: जळगाव महापालिका प्रभाग समिती निवडणुकीत नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि भाजपा बॅकफुटवर गेला. एकाच वेळी 27 नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपला मोठा हादरा बसला. परिणामी भाजप नेतृत्व या बंडखोरीबाबत काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता असतानाच विभागीय आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या बंडखोर भाजपा नगरसेवकांना व्हीपचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात का येऊ नयेत? याबाबत आयुक्तांनी नोटीसा बजावल्या आहेत.

मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात उभी फूट पडून शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला होता. यात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी भाजपतील फुटीर गटाचे नेते कुलभूषण पाटील यांची वर्णी लागली. दरम्यान, आपल्या गटाकडे सर्वाधीक ३० नगरसेवक असून पक्षाचे सभागृहातील गटनेता हे दिलीप पोकळे असतील असे पत्र देखील या गटातर्फे देण्यात आले. नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भाजपच्या सर्व सदस्यांसाठी व्हीप बजावला होता. भाजपच्या २७ नगरसेवकांनी याचे उल्लंघन केले. यामुळे दिलीप पोकळे आणि कुलभूषण पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या व्हिपचे उल्लंघन केले असल्याने त्यांना अपात्र करावे अशा मागणीचा अर्ज केला होता.

या अर्जावर निर्णय देतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांना नोटीसा बजावून त्यांना अपात्र का करण्यात येऊ नये? अशी विचारणा केली आहे. आज ही नोटीस बजावण्यात आली असून यावर संबंधीत नगरसेवकांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेत लवकरच स्थायी समिती सभापतींची निवड होणार आहे. या आधीच गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या अर्जावरील सुनावणीत विभागीय आयुक्तांनी भाजप सदस्यांना नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.