हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या; चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान

पुणे: सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारला कंटाळले असल्याने गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले आणि विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला – बुलढाणा – वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झाले. हिंमत असेल तर महाविकास आघाडीने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असे आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

विधान परिषद निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून विजयी झालेले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला – बुलढाणा – वाशिम मतदारसंघातून विजयी झालेले वसंत खंडेलवाल यांचे प्रदेशाध्यक्षांनी हार्दिक अभिनंदन केले. विधान परिषद निवडणुकीत यापूर्वीच भाजपाचे मुंबईतून राजहंस सिंह आणि धुळे – नंदूरबार मतदारसंघातून अमरिश पटेल बिनविरोध विजयी झाले असून पक्षाने एकूण सहापैकी चार जागा जिंकल्या आहेत. भाजपाला मुंबई आणि अकोला – बुलढाणा – वाशिम या जागा नव्याने मिळाल्या आहेत. प्रदेशाध्यक्षांनी सर्वच विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळली असून निवडणुकीत मतदानाची संधी मिळताच जनता भाजपाला मतदान करते. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत. सदस्य म्हणून अपात्र ठरण्याच्या भितीने ते त्या त्या पक्षासोबत राहत असले तरी गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भाजपाला मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचा विकास होणार नाही याची या लोकप्रतिनिधींना विशेषतः शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जाणीव आहे, अशी टीका त्यांनी केली.