पुढील चार तासात पुण्यासह ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार पाऊस

8

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. तसेच राज्यातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत असून, आजही पुढील तीन ते चार तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाड्याचा भाग, पालघर, पुणे आणि विदर्भातील काही भागात मध्यम ते तीव्र ढग दिसत असून, पुढच्या 3 ते 4 तासात या भागात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अहमदनगर भागात पाउस सुरू आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

आज (9 ऑक्टोबर) रात्रीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.