‘मी विकासाचेच राजकारण करणार, ध्वजाचे व रंगाचे राजकारण होऊ देणार नाही’ – रोहित पवार
कर्जत: कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात उंच भगव्या ध्वजाची ‘स्वराज्य ध्वज पूजन’ यात्रा कर्जतमधून सुरुवात झाली होती. ही यात्रा महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत देशातील नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज उभारणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेने लोकसहभागातून आणि सहकार्यातून खर्डा येथे भारतातील सर्वात उंच झेंडा भगवा ‘स्वराज्य ध्वज’ आज उभारण्यात आला.
“महाराष्ट्राला भव्य ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वैभवशाली परंपरा लाभली आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या खर्डा किल्ल्याच्या या भूमीला संवर्धित करून आपल्या इतिहासाची माहिती आणि ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीतून आपल्या परंपरेला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील लोकसहभागातून हा प्रयत्न केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत या ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीसाठी आपला सर्वांचा सहभाग आणि लाभलेले सहकार्य यासाठी मी आपला आभारी आहे.”
स्वराज्य ध्वज यात्रेचा प्रवास 9 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत झाला. 12 हजार किलोमीटरचा हा प्रवास होता. महाराष्ट्रातील 36 जिल्हे, देशातील 6 राज्यांचा प्रवास करत हा ध्वज आज खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्या समोर फडकविण्यात आला. या प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी स्वराज्य व भगव्या ध्वजाबाबत आपले विचार मांडत जात व धर्मावर राजकारण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली.
रोहित पवार म्हणाले की, काहीजण मला म्हणत की सुरवातीला तू विकासाविषयी बोलत होता. आता हे काय? त्यावर माझे उत्तर एकच आहे. मी विकासाचेच राजकारण करणार. ध्वजाचे व रंगाचे राजकारण मी होऊ देणार नाही. भगव्या ध्वजाचे राजकारण होऊ देणार नाही. काही लोक हा रंग हातात घेऊन त्यांचे राजकारण करतात ते होऊ द्यायचे नाही, असेही आमदार पवार यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, एखादी नवी गोष्ट घेतली तर त्याचे पूजन होते. हीच संस्कृती महत्त्वाची आहे. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांनी घाट बांधले, रस्ते केले, विहिरी बांधल्या त्या सर्वांसाठी. त्यांनी ते काही केवळ कोणत्या जाती धर्मासाठी केले नाही. हा सर्व संत, महापुरूषांचा विचार आहे. सर्वांना एकत्र घेऊन हा माणुसकीचा विचार रूजवायचा आहे. माणुसकीला महत्त्व द्यायचे आहे. माणुसकीचे प्रतीक असलेला हा भगवा स्वराज्य ध्वज आहे. या स्वराज्य ध्वजाचे आज समतेचे, एकतेचे विचार घेऊन जाणाऱ्यांनी पूजन केले आहे. पूजन करणारे हे लोक सामान्य कुटूंबातील मात्र असामान्य ताकदीचे आहेत.