‘’आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा, असं भाजपने म्हंटल तर ….’’; रोहित पवारांची भाजपवर खोचक टीका

35

मुंबई: स्वयंचलित पेट्रोल-डिझेल हे हवाई इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी महाग झाले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांत रविवारी सलग चौथ्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांची वाढ झाल्यामुळे देशभरात हे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरामुंळे विरोधक केंद्र सरकरावर टीका करत आहेत. दरम्यान विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचं इंधन महाग झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर मिश्किल शब्दात टीका केली आहे.

“विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग, अशा बातम्या आज बघायला मिळाल्या. त्यामुळे ‘ब्रेड मिळत नाही तर केक खा’ असं सांगणाऱ्या फ्रान्सच्या राणीची गोष्ट आठवली! आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा’, असं भाजपाच्या लोकांनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको!” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर सोमवारी इंधनाचे दर तेल कंपन्यांनी स्थिर ठेवले आहेत. मात्र असं असलं तरी दिल्ली, मुंबईसहीत अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांनी नवीन उच्चांक गाठले आहेत.

हवाई इंधन (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल- एटीएफ) ज्या दरांत विमान वाहतूक कंपन्यांना विकले जाते, त्यापेक्षा दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलचे दर आता ३३ टक्क्यांनी अधिक आहेत. दिल्लीत ‘एटीएफ’चे दर एका लिटरला ७९ रुपये इतके आहेत. देशभरातील सर्वात महाग इंधन राजस्थानमधील गंगानगर या सीमेवरील शहरात मिळत असून, तेथे पेट्रोलचे दर लिटरला ११७.८६ रुपये, तर डिझेलचे दर १०५.९५ रुपये आहेत.

मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी १११.७७ रुपये मोजावे लागत असून, दिल्लीतही हे दर आजवरचे सर्वाधिक, म्हणजे १०५.८४ रुपये इतके झाले आहेत. मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर १०२.५२ रुपये असून, दिल्लीत ९४.५७ रुपये आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.