‘आम्हाला देवळाची घंटा वाजविण्याची सवय, आज पहिल्यांदा नाट्यगृहातील घंटा वाजवली’ – अजित पवार
पुणे: राज्यसरकारने परवानगी दिल्यानंतर आजपासून नाट्यगृह, चित्रपटगृह खुली झाली आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह सुरु झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी पवार यांनी आम्हाला देवळातली घंटा वाजवायची सवय आहे, मात्र मी पहिल्यांदा नाट्यगृहातील घंटा वाजवली” असे म्हंटले. त्यांच्या या विधानानंतर एकच हशा पिकला..
आज सकाळी 8 वाजता अजित पवार यांचं बालगंधर्व रंगमंदिरात आगमन झालं. अजित पवारांचा नाट्य परिषद आणि कलाकारांच्या वतीनं सन्मान करण्यात आला. शिंदेशाही पगडी घालून आणि तलवार देऊन अजितदादांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, पूजा पवार, जयमाला इनामदार, सुरेश विश्वकर्मा, गिरीश परदेशी, प्रशांत जगताप, लक्ष्मीकांत खाबिया. विविध पक्षाचे राजकीय नेते, नाट्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अनेकवेळा भाषणा दरम्यान विनोद केले जातात. आज त्यांनी पुणे येथे असाच एक विनोद केला. त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुण्याला आले असता. त्यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय आहे. पण आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली. कोरोनामुळे लोकांमध्ये निराशा आली होती. पण आता तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्याने कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतोय. दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याचा विचार केला जाईल.
यशवंतराव चव्हाणांपासून सांस्कृतिक परंपरा जपली, शरद पवारांनी ही जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या क्षेत्राला भरभरून मदत दिली. अजून मदत करायला हवी याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कोल्हापूर चित्रनगरीत आणि मुंबई फिल्म सिटीत सुविधा देण्याचा विचार आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.