शमीला ट्रोल करणाऱ्यांना आता विराटने दिले प्रत्युत्तर

22

मुंबई: आयसीसी टी-20 विश्वचषकात उद्या भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या लढतीपूर्वी हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषद घेतली. यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर मोहम्मद शमी याला धर्माच्या आधारावर ट्रोल करणाऱ्यांना विराट कोहलीने झापले. तसेच आमचे संपूर्ण लक्ष बाहेरच्या ड्रामावर नसून सामना जिंकण्यावर आहे, असेही कोहली म्हणाला.

शमीला ट्रोल करणाऱ्यांवर बोलताना कोहली म्हणाला की, लोकं आपली ओळख लपवून अशा प्रकारचे कृत्य करतात. आजच्या काळात हे नियमीत झाले आहे. ट्रोलर्स जेव्हा एखाद्याला त्रास देतात तेव्हा ते सर्वात खालच्या पातळीवर उतरलेले असतात. मात्र यामुळे आमच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण बदलत नाही आणि आम्ही खेळाडू एकमेकांना सपोर्ट करतो.

धर्माचा आधार घेऊन एखाद्याला ट्रोल करणे अयोग्य आहे. मी कधीही कोणासोबत भेदभाव केलेला नाही, मात्र काही लोकांना हेच काम आहे. जर कोणाला मोहम्मद शमीच्या खेळात पॅशन दिसत नसेल तर मी त्यांना उत्तर देऊन माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही, असेही विराट म्हणाला.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थानचा 10 विकेट्सने पराभव झाला होता. या लढतीत मोहम्मद शमीसह सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली होती. यानंतर शमीला धर्माच्या आधारे ट्रोल करण्यात आले होते. यावर इरफान पठान, मोहम्मद कैफ, सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गजांनी प्रतिक्रिया देत हे चुकीचे असल्याचे म्हटले होते.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.