भाजपला ‘दे धक्का’, शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे 10 नगरसेवक अपात्र!

11

माथेरान: थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुळं तेथील वातावरण अचानक तापलं आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह १० नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे माथेरानचे राजकारण चांगलेच तापले होते. याच दहा नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मोठा दणका दिला.

भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेलेल्या माथेरान नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मोठा दणका दिला. भाजपवासी झालेल्या या दहाही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिला आहे. माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला.

माथेरान नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथस आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे या दहा नगरसेवकांना जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी अपात्र घोषित केले आहे.

प्रसाद सावंत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. याबाबतची अखेरची सुनावणी २७ ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी सुनावणीचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज नऊ नगरसेवकांसह एक स्वीकृत अशा दहाही भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित आहे. तसा आदेश सर्व नगरसेवक यांना पोस्टाने पाठवण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षात गेलेल्या या नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.