केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा अनेक केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. केंद्रीय तपास संस्थांचा वापर करुन धमकापलं जात आहे. अशा पद्धतीनं तपास संस्थांचा वापर गैर आहे. अशाप्रकारे तपास संस्थांचा वापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल. या तपास यंत्रणांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही, अशी खोचक टीका चव्हाण यांनी केलीय.

एनसीबी इथल्या काही प्रमाणातल्या ड्रग्सवर कारवाई करते. पण गुजरातमध्ये 30 हजार कोटी रुपयांचं ड्रग्स सापडलं त्याची कुणीच चर्चा करत नाही. लसीकरणाबाबतही फक्त प्रसिद्धी केली जात आहे. पण जगात दोन डोस घेतलेल्यांच्या यादीत देश 144 व्या स्थानी आहे. भारतात फक्त 24 टक्के लोकांना डोस मिळाले आहेत. खोटी प्रसिद्धी देऊन अपयश लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही चव्हाण यांनी मोदी सरकारवर केलीय.

याआधी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा भाजप सरकार ताशेरे ओढले होते ते म्हणाले होते की, राज्‍यातील सरकार स्‍थिर आहे. त्‍यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत राज्य सरकार अस्‍थिर करण्‍याचा प्रयत्‍न सुरु आहे. तुम्‍ही दवाबतंत्राचा वापर करा, छापे टाका. तुम्‍ही काहीही करु शकता. तरीही आघाडी सरकार आपलाकार्यकाळ पूर्ण करेलच अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

Read Also :