कोहलीच्या पदरी अखेर निराशाच, सात वर्ष कॅप्टन, पण एकही ट्रॉफी नाही

22

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतला कर्णधारपदाचा शेवटचा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळला. या आयपीएल हंगामानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं विराट कोहलीने यापूर्वीच जाहीर केले आहे. कोहली त्याच्या कर्णधारपदाच्या शेवटच्या आयपीएल सामन्यात कोलकात्याकडून पराभूत झाला त्याचबरोबर यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बंगळुरुचं आव्हानही संपुष्टात आलं.

सामन्यानंतर विराट खूपच इमोशनल झाला होता. इतक्या वर्ष कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता फायनली तो दिवस आला, ज्या दिवशी कर्णधारपदाला अलविदा म्हणायचंय… हा क्षण विराटसाठी खूपच भावूक होता. सामन्यानंतर त्याने आरसीबी फ्रँचायजी आणि सगळ्या चाहत्यांचे आभार मानले. आतापर्यंतच्या सपोर्टबद्दल त्याने आभार व्यक्त करताना यापुढे एक खेळाडू म्हणून मी माझ्यावतीने 120 टक्के देईल, अशी ग्वाहीही दिली.

विराट कोहली 7 वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही. ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर जोपर्यंत मी आयपीएलमध्ये खेळेल तोपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग असेन, असं विराटने सांगितलं.

विराट कोहली म्हणाला, ‘आता पुढील तीन वर्षांसाठी नवीन संघ तयार होईल. मी RCB साठीच खेळेल.निष्ठा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या संघाशी माझा संबंध आयपीएलमधील माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत टिकेल. केकेआरच्या हातून झालेल्या पराभवाबाबत विराट कोहली म्हणाला, ‘त्यांच्या फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये आमच्यावर वर्चस्व गाजवलं आणि विकेट घेत राहिले. आम्ही चांगली सुरुवात केली पण ती टिकवता आली नाही. आमच्या खराब फलंदाजीपेक्षा त्यांच्या चांगल्या गोलंदाजीबद्दल अधिक बोलायला हवे. कोहली म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले पण आम्ही 15 धावांनी मागे पडलो. सुनील नरेनने आज दाखवले की तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वारंवार विकेट घेणाऱ्यांमध्ये का आहे. सुनील नरेन, शाकिब आणि वरुण या तिघांनीही शानदार गोलंदाजी केली आणि आमचे फलंदाज मोकळेपणाने खेळू शकले नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.