चिनी कंपन्यांना बसणार 50 हजार कोटींचा फटका; ‘मेक इन इंडिया’ आणि घरगुती वस्तूंच्या खरेदीकडे नागरिकांचा कल

मुंबई: प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी जनतेने व्यापक मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानुसार सणासुदीच्या काळात चिनी वस्तूंना नागरिक आणि व्यापारीही फाटा देत असून, यामुळे येत्या काही काळात चिनी कंपन्यांना सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असा अंदाज ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ अर्थात ‘सीएआयटी’ने वर्तविला आहे.

दिवाळीपूर्व खरेदीमध्ये भारतात बनविलेल्या म्हणजेच ‘मेक इन इंडिया’ आणि घरगुती वस्तूंच्या खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून येत आहे, असे ‘सीएआयटी’चे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले आहे.

भारतासह विविध शेजारी देशांना त्रास देण्याचे धोरण चीनने गेल्या काही वर्षांपासून अवलंबलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी वस्तूंचा वापर न करता देशात बनलेल्या वस्तू वापरून आत्मनिर्भर भारत मोहिमेत आपल्या परीने योगदान देण्याचे आवाहन केले होते. या मोहिमेचे यश आता दिसू लागले असल्याचे मानले जात आहे.

असंख्य लोकांनी तसेच व्यापार्‍यांनी चिनी वस्तूंवर अघोषित बहिष्कार टाकलेला असल्याने त्याचा थेट फायदा देशातील उद्योगधंद्यांना होणार आहे, असे खंडेलवाल यांनी नमूद केले. चीनकडून सुरू असलेल्या आगळीकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सीएआयटी’ने गतवर्षी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हाक दिली होती. मात्र यंदा त्यापेक्षा मोठा फटका चिनी वस्तूंना बसणार आहे. कारण लोक स्वतःहून चिनी वस्तूंवर बहिष्काराची भाषा करू लागले आहेत.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!