नाशिकमध्ये ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक: ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भूमिपूजन केंद्राच्या राज्य आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे दिमाखदार सोहळ्यात आज दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी पार पडले. या कार्यक्रमास नाशिकचे पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, या संमेलनाचे उद्घाटन दि. ३ डिसेंबर रोजी होणार असून संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील करणार आहेत.
या संमेलनाचे अध्यक्ष विज्ञान लेखक जयंत नारळीकर, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रितो असतील. विशेष अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचा समारोप दि. ५ रोजी सायंकाळी ५ वाजता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, तसेच न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. आज झालेल्या भूमिपूजन सोहळ्यास महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, सर्व समिती प्रमुख, विश्वास ठाकूर, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, तसेच सर्व कार्यकारी समित्यांचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.