शेतकरी आंदोलनाला मोठं यश! कृषी कायदे रद्द करण्यावर आज शिक्कमोर्तब होणार, मोदी कॅबिनेटची बैठक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केलीय, त्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे, त्यात घेतलेल्या निर्णयावर मोहोर उमटेल. काही दिवसांपुर्वीच नरेंद्र मोदींनी देशाला संबोधीत करत तीनही वादग्रस्त कृषी कायदे सरकार वापस घेणार असल्याची घोषणा केली होती.
त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला ऐतिहासिक महत्व आहे. तीनही कायदे रद्द करणारं विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडलं जाणार आहे. 29 नोव्हेंबरला हे विधेयक सादर केलं जाणार आहे. कृषी मंत्रालयानं पीएमओशी चर्चा केल्यानंतरच हे नवं विधेयक तयार केलंय. त्यावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा होईल.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर हे तीन कृषी कायदे रद्द करणारं विधेयक पहिल्यांदा लोकसभेत मांडतील. त्यानंतर राज्यसभा आणि राहिलेली प्रक्रिया पार पाडली जाईल. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीव्हीवर देशाला संबोधीत केलं होतं. त्यात त्यांनी देशाची माफी मागत, तीनही वादग्रस्त कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. आम्ही जनतेला तीनही कायदे समजून सांगण्यात कमी पडलोत, हे तीनही कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आणले होते हेही त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.
मोदी सरकारनं तीन कृषी कायदे आणले आणि त्याविरोधात पंजाब, हरयाणामध्ये मोठा आगडोंब उसळला. गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन उभं आहे. त्याच आंदोलनासमोर झुकत मोदी सरकारला तीनही कृषी कायदे परत घ्यावे लागले. ह्या निर्णयानंतर आता शेतकरी आंदोलन संपणार अशी अपेक्षा केली जात असतानाच, तसं होणार नसल्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केलीय. विशेष म्हणजे मोदींच्या घोषणेवर विश्वास न ठेवता जोपर्यंत प्रत्यक्ष संसदेत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केलीय.