एसटी कर्मचाऱ्यांच्या नव्या वेतनाबाबतचे परिपत्रक जाहीर; जाणून घ्या कोणाला किती पगार?
मुंबई: मागील अनेक दिवसांपासून एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपानंतर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याची घोषणा केली. आता परिवहन मंत्री अनिल अरब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या नव्या वेतनाबाबतचे परिपत्रकच जाहीर केलेय. यात नव्या घोषणेनुसार कोणत्या एसटी कर्मचाऱ्याचा पगार किती होणार याची माहिती देण्यात आलीय. यानुसार चालक वाहकापासून तर मेकॅनिकपर्यंत पद आणि सेवेच्या वर्षानुसार ही पगारवाढ झालीय.
सुधारीत वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि १० वर्षांच्या आतील अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ५,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १० वर्ष, १ दिवसापासून ते २० वर्षांपर्यंतची सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ४,००० रुपयांची पगारवाढ करण्यात आलीय. तसेच २० वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना २ हजार ५००० रुपये पगारवाढ करण्यात आलीय.
घरभाडे भत्ता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच केली जावी, ही बाब देखील मान्य झाली आहे. या बाबी करारामध्ये होत्या. पण बेसिकचा विषय होता. म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतलाय की जे कर्मचारी १ ते १० वर्ष या श्रेणीत आहेत, या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक ५ हजारांची वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्याचं मूळ वेतन १२ हजार ०८० रुपये होतं, त्याचं वेतन आता १७ हजार ३९५ झालं आहे. मूळ वेतन १७ हजार ०८० वरून २४ हजार ५८४ रुपये झालं आहे. त्यामुळे जवळपास ७ हजार २०० रुपयांची पगारवाढ पहिल्या श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांची झाली आहे. जवळपास ४१ टक्के एवढी ही वाढ असून एसटीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी वाढ आहे. १० ते २० वर्षांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४ हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण पगार २३ हजार ०४० होता तो आता २८ हजार ८०० रुपये झाला आहे.
२० वर्षांहून अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २ हजार ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ वेतन २६ हजार आणि स्थूल वेतन ३७ हजार ४४० होतं, त्यांचं वेतन आता ४१ हजार ०४० झालं आहे. ज्याचं मूळ वेतन ३७ हजार होतं आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० होतं, त्यांना २५०० रुपयांची वाढ केल्यामुळे मूळ वेतन ३९ हजार ५०० तर स्थूल वेतन ५६ हजार ८८० होईल.