अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेची घोषणा

मुंबई: साधारण 54 दिवसांच्या लढ्यानंतर काल राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला. परिवहन मंत्री अनिल परब  आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची काल बैठक पार पडली आणि अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने या संपातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले तरीही काही कामगार संघटना नाराज असल्याचेही समोर आले आहे.

एसटी विलीनीकरणाच्या मुद्यावरून अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारीवर्ग ठाम असल्याने अखेरीस हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. दरम्यान कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली आणि या मुद्यावर सविस्तर चर्चा केली आणि अखेर संघटनेकडून संप मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.

दरम्यानच्या काळातील अनेक घडामोडीनंतर या महत्त्वपूर्ण घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असल्याची भावना व्यक्त होत आहे, मात्र काही कामगार संघटनांनी या निर्णयाला सपशेल विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांमध्ये फूट पडल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे.