मोठी बातमी! आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारीपर्यंत बंदच राहणार

मुंबई: कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूच्या संभव्य धोका लक्षात घेत आंतरराष्ट्रीय उड्डाणे  31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) जारी केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी 23 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारनं 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत घोषणा केली होती. मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहे. मात्र, त्यानंतर जगभरात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. 31 जानेवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे 23 मार्चपासून देशातील सर्व नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. परंतु काही देशात ‘वंदे भारत’ विमान सेवा आणि कोव्हिड बबल नियमांनुसार विमानसेवा सुरू आहे. इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेला हा नियम लागू नसणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे, असं देखील DGCA नं आपल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा येत्या 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव लक्षात घेता आता केंद्र सरकारनं आपला निर्णय मागे घेतला आहे. देशात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते.