दोन्ही डोस घेऊनही ओमायक्रॉन होतो, मग आता केंद्राने लसीचा बुस्टर डोस द्यायचा की नाही हे स्पष्ट करावे- अजित पवार

मुंबई: जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूने दहशत निर्माण केली आहे. या विषाणूने आत्ता भारतातही शिरकाव केला आहे. यात महाराष्ट्रात ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ही आठवर पोहचली आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे बुस्टर डोस संदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.
“नागरिकांना बुस्टर देण्याबाबत केंद्र सरकारने लवकराच लवकर निर्णय घ्यावा, बुस्टर डोस द्यायचा आहे का तर का द्यायचा? आणि जर नाही द्यायचा तर का नाही द्यायचा याचे केंद्राने स्पष्टीकरण द्यावे” असं अजित पवार म्हणाले आहेत. तसेच ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने पावले उचलली पाहिजे असंही अजित पवार म्हणाले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आज दादर चैत्यभूमीवर दाखल झाले होते.
यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतना अजित पवार म्हणाले की, “ओमायक्रॉनचं वाढतं संकट पाहता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कडक धोरण जाहीर करणे आणि राबवणे अतिशय गरजेचे आहे. ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. त्याठिकाणी वेगळी विशिष्ठ नियमावली असली पाहिजे.” असं मतही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
“दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात दुबईतून एक जोडं महाराष्ट्रात आलं. त्यानंतर त्यांना घरी सोडणाऱ्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर हा विषाणू संपूर्ण राज्यभर पसरला. आत्ताही देशातील वेगवेगळ्या राज्यांत एक-दोन असे रुग्ण आढळले. पण जिथे कुटुंबाला लागण झाली त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांनाही संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकजण मास्क वापरा काळजी घ्या सांगतात. पण तुर्तास तरी संसर्गाची तीव्रता तुलनेने कमी आहे. परंतु या संदर्भात देशपातळीवर आरोग्य विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे” असेही अजित पवार म्हणाले.