राहुल गांधींची २८ डिसेंबरला मुंबईत होणारी सभा पुढे ढकलली; भाई जगताप यांची माहिती

मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची मुंबई येथे २८ डिसेंबर रोजी होणारी शिवाजी पार्कवरील सभा पुढे ढकलण्यात आली आहे. ओमीक्रॉनच्या संकटामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली. तसंच, नव्या तारखा लवकरच जाहीर करु, असं देखील भाई जगताप यांनी सांगितलं. ते मुंबई माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसचा येत्या २८ डिसेंबरला वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभा आयोजित केली होती. मात्र, ओमीक्रॉनमुळे या सभेला मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे मुंबई काँग्रेस यांनी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी धाव घेतली. मात्र, मंगळवारी परवानगी मागणीची याचिका मागे घेतली.

या सगळ्या घडामोडीनंतर भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांची मुंबई होणारी सभा ओमीक्रॉनच्या संकटामुळे पुढे ढकलली आहे, अशी माहिती दिली. राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन करतच काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाईल. हा कार्यक्रम तेजपाल ऑडिटोरियममध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती भाई जगताप यांनी दिली.

याशिवाय, आम्ही १५ दिवसांपासून राज्य सरकारकडे सभेसाठी मागणी करत होतो. पण आम्हाला उत्तर आलं नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो, असं भाईंनी सांगितलं. तसंच पुढील मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नवी तारीख जाहीर झाल्यावर शिवाजी पार्कातच राहुल गांधी यांचा मेळावा होईल, असं भाई जगताप यांनी सांगितलं.