चिंता वाढवणारी बातमी: देशात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 170 वर!

मुंबई: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने  देशाची चिंता आणखी वाढवली आहे. ओमिक्रॉनचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून बाधितांची संख्या वाढत आहे. देशामध्ये सोमवारी ओमिक्रॉनबाधित आणखी रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक, गुजरात, केरळ आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आता 170वर पोहचली आहे.

आतापर्यंत देशातील 12 राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात , उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, चंदीगड या राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे सर्वात जास्त रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लागण झालेले 54 रुग्ण आढळले आहे. त्यापाठोपाठ दिल्लीमध्ये ओमिक्रॉनबाधितांची संख्या जास्त आहे. दिल्लीतील ओमिक्रॉनबाधितांपैकी 12 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

कर्नाटकातील धारवाड, भद्रावती, उडुपी, मंगळुरुमध्ये ओमिक्रॉनचे पाच नवीन रुग्ण आढळले. तर दिल्लीमध्ये देखील ओमिक्रॉनचे सहा नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे दिल्लीतील ओमिक्रॉनबाधितांची संख्या 28 वर गेली आहे. महत्वाचे म्हणजे दिल्लीतील ओमिक्रॉनबाधितांपैकी  12 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळाला आहे. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला. याठिकाणावरुन जगभरातील इतर देशात ओमिक्रॉनचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. जगभरातील 89 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा व्हेरिएंट डेल्टापेक्षा ओमिक्रॉन वेगान पसरत आहे त्यामुळे जगभरातील सर्वच देशांची चिंता वाढली आहे.