राज्यभरात आज शिवरायांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जाणार, कर्नाटकातील घटनेनंतर राष्ट्रवादीची घोषणा

मुंबई: कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेवर केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरातील शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केलीय.

कर्नाटकात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. रविवारी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी अभिवादन करतील, असं जयंत पाटील यांनी ट्वीटरवरुन जाहीर केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.