कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी: कोरोना महामारी, तौक्ते, क्यार, निसर्ग चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक संकटांवर मात करुन शासनाने सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत. मुरुग वाडा पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरे टेंबे) ३.५ कि.मी. लांबीच्या टेट्रापॉड आणि ग्रोयन धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे या भागातील धूप कमी होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते मिऱ्या बंदर येथील कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सांमत, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितमकुमार गर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कोनशिलेचे अनावरण करुन उपमुख्‍यमंत्र्यांनी बंधाऱ्याच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती करुन घेतली.

यावेळी ते म्हणाले की, या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे पांढऱ्या समुद्र किनाऱ्याची धूप थांबणार आहे. समुद्र किनारी असणाऱ्या जमिनीचे, शेतीचे, गावांचे संरक्षण होणार आहे.महत्त्वाचं म्हणजे समुद्राला त्याच्या सीमेत अडविण्याचं काम हा बंधारा करेल. या प्रकल्पासाठी जवळपास 190 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच या प्रकल्पाच्या सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीचीही तरतूद तात्काळ करण्यात येईल. या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम दोन वर्षात पूर्ण होईल अशी हमी त्यांनी यावेळी दिली. बंधाऱ्याचे व सुशोभीकरणाचे काम उत्कृष्ट व दर्जेदार झाले पाहिजे. पुढची 50 वर्षे डोळयासमोर ठेवून चांगल्या प्रतीचे काम झाले पाहिजे. या बंधाऱ्याचा उपयोग या भागातील समुद्रकिनारे वाचवण्यासाठी होईल. जमीन, शेतीचं, गावांचं संरक्षण करतानाच, इथला निसर्ग, पशुपक्षांचा अधिवास, कांदळवनांचं संरक्षण करण्यातही, हा बंधारा महत्त्वाची भूमिका बजावेल.

शहराच्या सार्वजनिक बाबींच्या विकासासाठी शासनाला स्थानिकांकडून जमिनी घ्याव्या लागतात. रत्नागिरीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करताना स्थानिकांनी याबाबत सहकार्य करावे. त्यांच्या सहकार्याबद्दल योग्य तो मोबदला दिला जाईल असेही ते म्हणाले.