जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ च्या ८५७ कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव शासकीय यंत्रणांनी तात्काळ द्यावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

56

सोलापूर: सोलापूर जिल्हा दौऱ्यादरम्यान सोलापूर नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण 702 कोटी, अनुचित जाती उपयोजना 151 कोटी व आदिवासी उपयोजनासाठी 4 कोटी 28 लाख असे एकूण 857 कोटी 28 लाख निधी मंजूर आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत निविदा प्रक्रिया राबवून जास्तीत जास्त विकास कामांचे कार्यारंभ आदेश दिले गेले पाहिजेत, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामाचे प्रस्ताव दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडे सादर करावेत. महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता 15 ते 20 सप्टेंबर 2024 दरम्यान लागण्याची शक्यता आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत त्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही अत्यंत गतीने करावी, असेही त्यांनी सूचित केले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 25 अंतर्गत कृषी व संलग्न सेवा 51 कोटी, ग्राम विकास 61 कोटी, नागरी क्षेत्राचा विकास 125 कोटी, पाटबंधारे व पुर नियंत्रण 63 कोटी, ऊर्जा विकास 56 कोटी 40 लाख, रस्ते विकास 76 कोटी, सामान्य शिक्षण 42 कोटी, आरोग्य क्षेत्र 62.65 कोटी, तीर्थक्षेत्र, पर्यटन, गड किल्ले 43.75 कोटी, महिला बाल विकास 20.86 कोटी व्यायामशळा व क्रीडांगण विकास 7 कोटी अशा महत्त्वाच्या क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असल्याची माहिती पालकमंत्री श्री पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट सांगोला हे दोन आकांक्षीत तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे यासाठी दहा कोटीचा निधी ठेवण्यात आलेला आहे. तसेच ज्या यंत्रणांनी अद्याप सन 2023- 24 मधील मंजूर कामासाठी आवश्यक दायित्वाच्या निधीची मागणी केली नाही ती मागणी लवकरात लवकर करावी. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाहीत त्यांनी ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निर्देशित केले.

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजनांची संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत मंजुरी दिलेली प्रकरणे, प्रत्यक्ष पूर्ण झालेली घरकुलांची संख्या, अपूर्ण घरकुलांची संख्या व त्याची कारणे आदी बाबीची सविस्तर माहिती पुढील आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. महापालिकेने रमाई घरकुल योजनेअंतर्गत 2700 घरांची कामे पूर्ण केलेली आहेत परंतु अपूर्ण घरकुलांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने महापालिकेने यामध्ये अत्यंत गतीने काम करून संबंधित लाभार्थ्यांची घरकुल पूर्ण करण्याची कारवाई केली पाहिजे असे त्यांनी सूचित केले.

महापालिकेच्या दुहेरी पाईपलाईन तसेच उड्डाणपुलेच्या कामकाजाचाही चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन याबाबत स्वतंत्र बैठका घेऊन ही कामे मार्गी लावण्याची कारवाई करण्यात येईल असे सांगितले. वीज वितरण कंपनीने त्यांच्याकडील विविध कामाच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना केली. अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांची संबंधित सदस्य सोबत भेट घेऊ असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने त्यांच्याकडील विविध विकासात्मक कामाच्या मंजूर निधीतून आवश्यक कामे त्वरित प्रस्तावित करावीत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कृषी सेवा केंद्रातून औषध घेऊन फवारणी केल्याने पिकांची नुकसान भरपाई पिकांचे नुकसान झालेले आहे अशा कृषी सेवा केंद्राची तपासणी करावी तसेच पिकांचा तपासणी अहवाल मागून घ्यावा असं संबंधित कृषी सेवा केंद्र सील करण्याचे निर्देश पाटील यांनी कृषी विभागाला दिले.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले- तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उपायुक्त नियोजन संजय कोलगणे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.