नारायण राणेंच्या घरावर लागली नोटीस, पोलिसांकडून राणे समर्थकांची कोंडी!
सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणाच्या अनुषंगाने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवान घडामोडी सुरु आहेत. काहीवेळापूर्वीच कणकवली पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. नारायण राणे यांच्याकडे नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याची माहिती आहे. त्यासाठी नारायण राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. मात्र, नारायण राणे पोलीस ठाण्यात न आल्याने आता पोलिसांनी त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्याठिकाणी नोटीस चिकटवली आहे. यानंतर पोलिसांकडून नारायण राणे तपासात सहकार्य नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या कणकवलीत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. आता नारायण राणे आणि भाजपकडून या सगळ्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
कणकवली हा राणे कुटुंबीयांचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी नारायण राणे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे नितेश राणे यांना अटक झाल्यास याठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन कणकवलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सिंधुदुर्गात १२ वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित असून ते येथील परिस्थिती हाताळत आहेत. याशिवाय, कणकवलीत दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्हा सत्र न्यायालय आणि कणकवलीतील प्रत्येक मोठ्या चौकात पोलिसांचा फौजफाटा दिसत आहे. तसेच नारायण राणे जात असलेल्या प्रत्येक ठिकाणी शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या या परिसराला लष्करी छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात सध्या नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. थोड्याचवेळात वकिलांचा युक्तिवाद पूर्ण होऊन न्यायालयाकडून निकाल दिला जाईल. त्यावेळी नितेश राणे यांना जामीन मिळणार की अटक होणार, हे पाहावे लागेल.