मविआला मोठा धक्का: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व, 19 पैकी 10 जागा भाजप विजयी

सिंधुदुर्गः गेल्या काही दिवसांपासून कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू होती. जिल्हा बँक पुन्हा नारायण राणेंच्या ताब्यात जाणार की महाविकास आघाडी सत्ता मिळवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु जिल्हा बँकेची सत्ता पुन्हा एकदा राणेंच्या पर्यायानं भाजपच्या ताब्यात आलीय.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत दोन दिग्गज नेते पराभूत झालेत. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा पराभव झालाय. १४-५ च्या फरकाने भारतीय जनता पक्ष पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनलने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर दणदणीत विजय मिळवला असून, सहकार समृद्धी पॅनलचा धुव्वा उडालाय.

भाजपच्या विठ्ठल देसाई यांनी ईश्वरचिठ्ठीच्या मदतीनं विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव केलाय. तर भाजपच्या अतुल काळसेकरांनी मविआच्या विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवींना पराभवाची धूळ चारली. तर दुसरीकडे राजन तेलींचा वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी पराभव केलाय. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था या मतदारसंघातून भाजपच्या राजन तेलींचा पराभव झालाय.

राजन तेली यांचा पराभव करणारे सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे चुलत बंधू आहेत. आतापर्यंत १९ जागांचे निकाल जाहीर करण्यात आलेत. त्यातील पाच जागा महाविकास आघाडील सरकारला, तर १४ जागा भाजपनं जिंकल्यात. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण ९८१ पैकी तब्बल ९६८ मतदारांनी म्हणजे ९८.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये ११५ महिला व ८५३ पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नव्हतं.