तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलंस, मी आंघोळ करता करता थांबलो – नारायण राणे

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्वाधिक रंजक लढतीत बाजी मारलेल्या विठ्ठल देसाई यांच्या विजयाची सकाळपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही कणकवलीतील पत्रकारपरिषदेवेळी ही बाब बोलून दाखवली.

पत्रकारपरिषद सुरु होण्यापूर्वी नारायण राणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नेत्यांशी गप्पा मारत होते. त्यावेळी नारायण राणे यांनी विठ्ठल देसाई यांच्याकडे पाहून, जिंकलास, खरं वाटतंय का, असा सवाल विचारला. त्यावर एकच हशा पिकला. त्यानंतर राणे म्हणाले की, नशीब ए हा नशीब, चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठं नशीब. तू आम्हाला टेन्शनमध्येच पाठवलंस, मी आंघोळ करता करता थांबलो, असे नारायण राणे यांनी सांगितले.

कणकवलीमध्ये सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांच्यात जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी लढत झाली होती. मतमोजणीदरम्यान सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मते पडली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीच्या सहाय्याने निकाल लावण्यात आला. यामध्ये विठ्ठल देसाई यांचा विजय झाला. सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना उत्साहाचे भरते आले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या सतीश सावंत यांना नारायण राणे यांनी टोला लगावला. आपली औकाद नाही. निवडणुकीत ३६ मतं मिळत नाहीत आणि हा माणूस विधानसभा निवडणूक लढण्याच्या गोष्टी करतो, असे नारायण राणे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!