नॉट रिचेबल असणारे नितेश राणे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह; फेसबुक पोस्टनं खळबळ
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातील राजकारण चांगलं टिपेला पोहोचलंय. मग तो संतोष परब हल्ला प्रकरण असो किंवा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक असो. सिंधुदुर्गातील राजकारण धगधगतं राहिलंय. संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे.
विशेष म्हणजे अटकेची टांगती तलवार असतानाच नितेश राणेंनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या फेसबुक पोस्टमध्ये नितेश राणेंनी एक फोटो शेअर केलाय, त्या फोटोला गाडला अशी कॅप्शन दिलीय. फोटोमध्ये सतीश सावंतांच्या अंगावर नितेश राणे उभे असलेलं पाहायला मिळतंय. पण नितेश राणे गायब असूनही सोशल मीडियावर सक्रिय असल्यानं पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांच्या शोधाची तपासचक्रे गतिमान केली आहेत.
दुसरीकडे गिरगावातील भाजप कार्यालयाशेजारीच नितेश राणे यांचे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरवर नितेश राणे यांचा फोटो लावण्यात आला असून, ते हरवले आहेत, असं लिहिलंय. तसेच त्यांना शोधून देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाईल, असंही लिहिलंय. त्यामुळे राणेंना एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यानंतर नितेश राणेंची ही फेसबुक पोस्ट आल्यानं चर्चांना उधाण आलंय.