मुंबईतील विहिरींतून ८० कोटीचे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करा – आशिष शेलार

8

मुंबई: मुंबईतील जलस्त्रोतातून सुमारे ८० कोटींची पाणी चोरी झाली असून टँकर माफिया फोफावले असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच या टँकर माफियांवर कारवा करण्याची मागणी शेलारांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना केली आहे. शेलारांनी पत्र लिहून महानगरपालिका आयुक्तांनी एसआयटीमार्फत कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईत २५१ अवैध जलविहिरी आहेत. पाणी उपसावर कोणत्याही कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे पाणी चोरी करणाऱ्यांवर प्रशासनाचा वचक नाही असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, मुंबई शहरात 19,000 पेक्षा जास्त पाण्याच्या विहिरी आहेत. ज्यापैकी 12,500 बोअरवेल आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने 25 जलकुंभांना नोटिसा बजावल्या असून त्यापैकी 251 अवैध जलविहिरी असून यातील एकाच जलकुंभातून 80 कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याचेही बाब समोर आली आहे. यावर कोणतेही नियमन किंवा कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे अवैध पाणी टँकर माफियांचे फावले असून मुंबई विभागात 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे मुंबईतील बेकायदेशीर व अनियंत्रित पाणी चोरीचा तपास करून त्यांना दंड आकारून ही चोरी थांबवणे आवश्यक आहे. मुंबईच्या विद्यमान भूजल संसाधनाच्या वापराची क्षमता लक्षात घेऊन वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून पाणी वापराचे धोरण निर्धारित करणे अत्यावश्यक आहे. म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेशातील अन्य नगरपालिकांच्या समन्वयाने त्वरित याबाबत एक एसआयटी कमिटी गठीत करण्यात यावी अशी विनंती मी या निमित्ताने करतो आहे. या एसआयटीने बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.