सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करा व विश्वासास पात्र बना – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई: सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच, पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबरच वर्दीच्या सर्वोच्चतेचा सन्मान करा; असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

मंत्रालयातील गृहमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी श्री. वळसे पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी परिविक्षाधीन अधिकारी अभयसिंह देशमुख (प्रशिक्षण जिल्हा लातूर), गोकुल राज (प्रशिक्षण जिल्हा कोल्हापूर), अशीत कांबळे (प्रशिक्षण जिल्हा जळगाव), महक स्वामी (प्रशिक्षण जिल्हा वाशीम), रश्मिथा राव निथीपुडी (प्रशिक्षण जिल्हा बीड), पंकज अतुलकर (प्रशिक्षण जिल्हा औरंगाबाद ग्रामीण), ऋषीकेश रेड्डी सिंगा रेड्डी (प्रशिक्षण जिल्हा रत्नागिरी), तेगबीर सिंह संधू (प्रशिक्षण जिल्हा पुणे ग्रामीण), एम.व्ही. सत्या साई कार्तिक (प्रशिक्षण जिल्हा सोलापूर ग्रामीण), शफकत अम्ना (प्रशिक्षण जिल्हा वर्धा) उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री वळसे –पाटील  म्हणाले, पोलिसांकडून जनतेला चांगल्या वर्तनाची तसेच मदतीची अपेक्षा असते. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयातच नव्हे तर समाजात वावरतानादेखील आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याप्रति जागरूक राहिले पाहिजे. कोरोना काळात पोलिसांनी गरीब, गरजूंना मोठ्या प्रमाणावर केलेल्या मदतीमुळे पोलिसांबद्दल जनमानसामध्ये विश्वास अधिक वाढीस लागला आहे. हा विश्वास टिकविण्याबरोबरच जनतेशी संपर्क आणि संवाद वाढविण्यावर भर देण्यात यावा.

कर्तव्य बजावताना पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्नरत राहावे. पोलिसांनी जनतेचा मित्र म्हणून काम करावे. पीडित, अन्याय-अत्याचारग्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा, असेही वळसे-पाटील यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच अपराधसिद्धतेचा दर उंचाविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच पोलीस दलाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन विशेष प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!