भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

20

मुंबई: महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाची, बलिदानाची, शौर्याची परंपरा आहे. महाराष्ट्र पोलीस दल जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त झालेले पोलीस दल आहे. या पोलीस दलाचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. अशा महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्याची आपणास मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत सर्वसामान्यांचे आपण आधारवड व्हा, पोलीस दलाची शान वाढवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना केले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी परिविक्षाधीन अधिकारी अभयसिंह देशमुख (प्रशिक्षण जिल्हा लातूर), गोकुल राज (प्रशिक्षण जिल्हा कोल्हापूर), अशीत कांबळे (प्रशिक्षण जिल्हा जळगाव), महक स्वामी (प्रशिक्षण जिल्हा वाशिम), रश्मिथा राव निथीपुडी (प्रशिक्षण जिल्हा बीड), पंकज अतुलकर (प्रशिक्षण जिल्हा औरंगाबाद ग्रामीण), ऋषीकेश रेड्डी सिंगा रेड्डी (प्रशिक्षण जिल्हा रत्नागिरी), तेगबीर सिंह संधू (प्रशिक्षण जिल्हा पुणे ग्रामीण),एम.व्ही. सत्या साई कार्तिक (प्रशिक्षण जिल्हा सोलापूर ग्रामीण), शफकत अम्ना (प्रशिक्षण जिल्हा वर्धा) उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलीस दलातील अधिकारी म्हणून सर्वसामान्य जनतेला तुमचा आधार वाटला पाहिजे. ‘आपला माणूस’ अशी तुमची समाजात प्रतिमा असली पाहिजे. नोकरी करताना तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुमच्या कार्यालयात येणाऱ्या आपल्या माता, भगिनींना आपण सन्मानाची वागणूक द्या. त्यांचे प्रश्न समजून घ्या. शाळकरी, महाविद्यालयीन मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करा. महाराष्ट्राचा वारसा, इतिहास, सामाजिक लढे, चळवळी, परंपरा आपण समजून घ्या.

महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढवण्याची, प्रतिष्ठा जपण्याची, प्रतिमा उंचावण्यासाठी कार्यरत राहून महाराष्ट्र पोलीस दलाचे वैभव समृध्द करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.