हा तर दोंडाईचा पोलिसांनी केलेला खुन, 302 प्रमाणे गुन्हे दाखल करा अन्यथा..- आ. विनायकराव मेटे

धुळे : दोंडाईचा जि. धुळे येथिल मराठा कुटुंबातील कै. मोहन सदाशिव मराठे हा युवक बाजार समितीत हमाली काम करत होता. त्याच्यावर चोरीचा संशय घेवून दोंडाईचा पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले होते. मात्र, दिवसभर आई तसेच स्थानिक नगरसेवक यांनी वारंवार विचारणा करूनही त्याला कोणासही भेटू दिले नाही. संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान त्याला दुपारी 3.30 वाजताच सोडून दिल्याचे त्याच्या आईला सांगण्यात आले. काही वेळातच त्याचा मृतदेह दोंडाईचा शहरातील एका सुनसान रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळून आला. आई, पत्नी, समाजातील स्थानिक नगरसेवक तसेच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय आदींनी संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून कारवाई करण्याची मागणी करित मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सदरचा तपास CID कडे सोपविला. पोलिस अधिकारी व 2 कर्मचारी निलंबित करण्यात आलेत. मात्र, अजूनही कोणावरही गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. त्यांचे कुटुंबिय व स्थानिक नागरिकांनी हा खून पोलिसांनीच केल्याचा आरोप केला आहे.

आज सोमवार दि. 12 /10/2020 रोजी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायकराव मेटे साहेबांनी मृताच्या कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन केले तसेच भरीव अशी आर्थिक मदतही कुटुंबियांना सुपूर्द केली. कै. मोहन मराठे यांच्या पश्चात वृद्ध आई, अपंग पत्नी व तिन लहान मुली असा परिवार आहे. यावेळी मेटे साहेबांनी पालकमंत्री श्री. अब्दुल सत्तार, नाशिक पोलिस IG श्री. प्रतापराव दिघावकर यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या दोंडाईचा येथिल नागरिकांशी चर्चा केली. यावेळी जनतेतील पोलिसांविषयीचा क्रोध स्पष्ट जाणवत होता. नंतर धुळे येथे पोलिस अधिक्षक यांची भेट घेवून व पत्रकार परिषद घेवून दोषींवर 302 अन्वये 2 दिवसांत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसे न केल्यास पोलिस अधिक्षक कार्यालया समोर स्वतः बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर, केशरानंद उद्योग समुहाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, माजी आ. रामकृष्ण पाटील, मराठा क्रांती मोर्च्याचे धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे नंदुरबार येथिल जि. प. चे माजी उपाध्यक्ष वकिल पाटील, जेष्ठ नेते संतोष मराठे, दोंडाईचा नगरसेवक विजय मराठे, छोटू मराठे, निंबाजी मराठे, नाशिकचे उद्योजक धनाजी लगड, अजिंक्य चुंभले आदिंसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.