विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

5

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, ‘हम सब एक है’ या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे.

विकास, वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित ‘सप्तर्षी योजना’ म्हणून ओळखला जाईल असा हा अर्थसंकल्प आहे. फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची फळं देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचावीत आणि अंत्योदयाचे पंतप्रधानांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे ह्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. नालेसफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करणारा आणि त्याच वेळेस देशातील लाखो छोट्या उद्योजकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे.

देशातील अत्यंत प्रामाणिक अशा नोकरदार मध्यमवर्गाचादेखील उचित विचार या अर्थसंकल्पात केला आहे.

एकूणच भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाचा अमृतकाल सुरु असताना, आणि जग मंदीशी आणि इतर विविध समस्यांशी झुंजत असताना, ह्या अर्थसंकल्पाने भारत महासत्ता होण्यासाठी एक पाऊल तर टाकलंच आहे पण त्याचवेळेस संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प असल्याचे  मुनगंटीवार म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.